झपताल

ओचे बांधून पहाट उठते... 
तेव्हापासून झपझपा वावरत असतेस.
कुरकुरणाऱ्या पाळण्यांमधून
दोन डोळे उमलू लागतात
आणि मग इवल्या इवल्या मोदकमुठींतून 
तुझ्या स्तनांवर  बाळसे चढते. 
उभे नेसून वावरत असतेस. 
तुझ्या पोतेऱ्याने म्हातारी चूल 
पुन्हा एकदा लाल होते. 
आणि नंतर उगवता सूर्य दोरीवरील तीन मुतेले वाळवू लागतो, म्हणून तो तुला हवा असतो! 
मधून मधून तुझ्या पायांमध्ये माझी स्वप्ने मांजरासारखी लुडबुडत असतात, 
त्यांची मान चिमटीत धरुन 
तू त्यांना बाजुला करतेस. 
तरीपण चिऊ काऊच्या मंमंमधील 
एक उरलेला घास त्यांनाही मिळतो.
तू घरभर भिरभिरत असतेस, लहान मोठ्या वस्तुंमध्‍ये
तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात..
स्वागतासाठी "सुहासिनी"असतेस,
वाढतांना "यक्षिणी"असतेस, 
भरवतांना "पक्षिणी" असतेस,
साठवतांना "संहिता" असतेस, 
भविष्‍याकरता "स्वप्नसती" असतेस.
....संसाराच्या दहा फुटी खोलीत दिवसाच्या चोवीस मात्रा
चपखल बसवणारी तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही.

- विंदा करंदीकर


रसग्रहण :
विंदा करंदीकर एकोणीसशे साठच्या कालखंडातील 'ज्ञानपीठ पुरस्कार' प्राप्त एक नामवंत कवी आहेत. मर्ढेकरांनी आणलेला नव काव्याचा प्रवाह यांनी समृद्ध केला. कवितेच्या बाबतीत त्यांनी अनेक प्रयोग केले. मुक्तसुनीते,तालचित्रे,विरुपिका अशा प्रकारामध्ये त्यांनी कविता केल्या. त्यांचा कवितांना चिंतनशीलतेची व प्रायोगिकतेची जोड आहे. 'झपताल' ही कविता 'धृपद' या काव्यसंग्रहातील असून सात तालचित्रांपैकी एक तालचित्र आहे.
'झपताल' या कवितेतील स्री ही गृहिणी मध्यमवर्गीय आहे. हे चित्र पन्नास वर्षापूर्वीच्या गृहिणीचे आहे. त्यावेळी तिचे कुटुंब एवढेच तीचे जग होते. दहाफुटी खोलीचा उल्लेख मध्यमवर्गीय जीवनाचा निर्देश करतो. तर अशा साध्या संसाराचा डोलारा ती सांभाळते, तिची ही किमया त्याला उमगत नाही .' चोवीस मात्रा' चोवीस तासांशी निगडित आहेत .स्त्रीचे जीवन दुसऱ्याला देण्यासाठी असते. सर्व सामान्य संसारात अनेक उणिवा असतात ,पण त्याकडे दुर्लक्ष करून ती सोशिक स्वभावाने त्याला पूर्णत्व आणते असा भाव या कवितेतून प्रतीत होतो.
कवीने या कवितेमध्ये स्वतःच्या संसारासाठी सतत दिवसाच्या चोवीस तासात राबणाऱ्या पत्नीबद्दलचा आदर , कृतज्ञता यातून व्यक्त केली आहे . तबल्याच्या चोवीस मात्रा दहा मात्रांच्या कालावधीत वाजविण्याची किमया तिरखवा साहेबांसारखा एखादाच नामवंत तबलावादक करू शकतो. त्याप्रमाणे ही पत्नी दिवस रात्र सामान्य संसाराला आपल्या कष्टाने परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असते. तिची ही किमया पतीला उलगडत नाही.

ओचे बांधून पहाट उठते........तेंव्हापासून झपाझपा वावरत असतेस.

इथे पत्नी पहाटे उठत नाही तर पहाट तिच्याबरोबर ओचे बांधून उठते. तेव्हापासून पत्नीचा घरभर वावर सुरू होतो. सकाळी ती उठल्यावर सर्वप्रथम मुलाला दुध पाजते. त्या तान्हुल्याचास्पर्श स्तनांना होतो तेव्हा तिला भरून येते. याचे भावस्पर्शी वर्णन कवी करतात.

.........कुरकुरणाऱ्या पाळण्यामधून दोन डोळे उमलू लागतात;

आणि मग इवल्या इवल्या मोडकमुठीतून तुझ्या स्तनावर बाळसे चढते, मुलाचे पिणे संपते. ती चुलीला पोतेरे करते तिच्या पोतेऱ्याने रात्रीची म्हातारी चूल पुन्हा तरुण होते.नव्या दिवसाला ती नव्याने रांधू लागते .आता सूर्याची आवश्यक ता फक्त तिला बाळाची दुपटी वाळवण्यासाठी होतो. त्यासाठी फक्त तिला हवा असतो. या लगबगीत ती पतीची स्वप्ने पायात लुडबुडणाऱ्या मांजराला चिमटीत मान धरून बाजूला करते पण त्यांना ती दूर लोटत नाही यासाठी वापरलेली प्रतिमा अर्थपूर्ण आहे.

' .......तरी पण चिऊकाऊच्या मंमंमधील एक घास त्यांनाही मिळतो .....'

कवीने त्याच्यासाठी तिचे लक्ष यासाठी वापरलेली चिऊकाऊच्या मंमंमधील घासाची प्रतिमा समर्पक आहे .त्याचा संसार दहा बाय दहाचा. त्यात घरभर भिरभिरणाऱ्या पत्नीची प्रतिबिंबे प्रत्येक लहानमोठया वस्तूमध्ये रेंगाळत असतात. तिची अनेकविध रूपे इथे कवीने सांगितलेली आहेत. गृहस्थाश्रमाच्या सर्व कर्तव्यात ती तत्पर असते. जेव्हा स्वागत करायची वेळ येते तेव्हा ती 'सुहासिनी' असते . जेवण वाढताना ती 'यक्षिणी' होतेस , बाळाला भरवताना 'पक्षिणी' असतेस तर घरासाठी साठवून ठेवायचे असते तेव्हा ती 'संहिता' असतेस. अशी अनेक रूपे ती घेते. अर्थात तिचे हे कार्यक्षेत्र संसार एवढेच आहे तिचा परीघ हा संसारपुरता मर्यादित आहे. तिची ही किमया त्याला उमगत नाही.
संसाराच्या दहाफुटी खोली दिवसाच्या चोवीस मात्रा चपलख बसवणारी तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही. सर्वसामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या कवीच्या केवळ दहा फूट बाय दहा फूट इवल्याश्या खोलीत ती दिवसाचे चोवीस तास काम करते याचे कवीला आश्चर्य वाटते .
या कवितेची भाषा ही ओघवती,लयबद्ध , तालबद्ध आहे . यामध्ये अनेक समर्पक प्रतिमा कवीने योजल्या आहेत. उदा. उमलणारे दोन डोळे , मोदकमुठ , म्हातारी चूल , मांजरासारखी लुडबुडणारी स्वप्ने , चिऊकाऊच्या मम् मधला उरलेला एक घास , यातील चूल पोतेरे कालबाह्य झाले असले तरी आजही प्रत्येक स्त्री संसारात तेवढीच गुंतलेली असते . आज तिचे कार्यक्षेत्र विस्तारले आहे . तिने दहा बाय दहा चा परीघ ओलांडला असला तरी तिचा आत्मा मात्र प्रपंचातच असतो 

Comments

Popular posts from this blog

संत एकनाथ - भारूड