संत एकनाथ - भारूड

 

संत एकनाथ - भारूड



 संत एकनाथ यांचा जन्म . .1533 मध्ये पैठण या ठिकाणी झाला .असे मानण्यात येते. एकनाथांच्या घरात भागवतभक्ती अनेक पिढयांची  होती. त्यामुळेच  त्यांच्या कार्यात भागवतभक्ती अवतरली संत एकनाथ मोठे  बुद्धी मान  आणि श्रद्धावान होते .

     वारकरी  संप्रदायात संत एकनाथांच्या लेखनाचे वै शिष्टयपूर्ण स्थान आहे .वारकरी संप्रदायाच्या प्रसार आणि प्रचारात त्यांचे खूप मोठे  योगदान आहे.देवगिरीच्या यादवांची राजवट सम्पल्यांनातर महाराष्ट्रावर  सतत इस्लामी आक्रमणे झाली. देवळे नष्ट झाली.भोंदूचा संस्कृती, भाषा या सर्वांवर परिणाम झाला. गुरूंचे प्रस्थ वाढले लोक धर्मांतर करू लागले. अशा काळात संत एकनाथांनी हिंदूंची धर्मभावना  जागृत केली .भक्तिमार्गाचे पुनर्जीवन केले. समाजाला  रुचेल , पचेल अशा सोप्या  भाषेत त्यांनी समाजाच्या प्रत्येक वर्गाचा विचार करून ग्रंथरचना केली .नाथांनी जातीभेदाचे निर्मुलन करण्याचा मोठा प्रयत्न केला.

            नाथांच्या रूपकात्मक लेखनाचा अविष्कार त्यांच्या भारुडातून दिसून येतोत्यांच्या भारुडात विषयविविधता,नाट्यत्मकता,संवादात्मकता आहे. भारूड म्हणजे 'बहुरूढ ते भारूड 'एक लोकप्रिय  गीत ,कूट शैलीतील गाणे . भारूड हा शब्द मूळ' ' भारहाडू या कानडी शब्दापासून आला असून त्याचा अर्थ ' जनगीत 'असा  होता . भारुडात चमत्कृतीक गूढार्थ असतो. भारूड वाङ मय हे मराठी वाङ मयाचे एक वैशिष्ट्य आहे. भारूडमधून तत्वज्ञान किंवा अध्यात्म सोपे करून सांगितले आहे.त्यामुळे सर्वसामान्य माणसांना अध्यात्माचा अर्थ कळला. नाट्यमय रीतीने रूपकात्मक पद्धतीने अध्यात्माचा उपदेश आणि तत्वज्ञान भारुडातून सांगितले गेले. धावत्या चाली ,गेयता, नाट्यमयता,लोकभाषेचा योग्य वापर यामुळे भारुडे हा काव्यप्रकार आकर्षक ठरला ,' भारूड 'ही रचना इतर भाषेपेक्षा मराठी भाषेतच जास्त समाजाभिमुख वाङमय म्हणूनही लोकप्रिय झाला.

         संत ज्ञानदेवापासून  संत निळोबापर्यंत सर्वच संतांनी कमी जास्त प्रमाणात भारूड रचना केलेली आढळते .संत ज्ञानेश्वर हेच मराठीतील भारूड वाङ मयाचे आद्य रचना कार  आहेत. ज्ञानदेवांची भारुडे आध्यात्मिक उपदेशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत.संत नामदेवांची भारुडे साधी,सोपी आहेत. संत तुकारामांच्या भारुडात विविधता आढळते.उपहासात्मक, विनोदी,वर्णनात्मक अशी विविधता त्यांच्या भारुडात आहे.

               'भारूड' या वाङमयप्रकाराला खऱ्या अर्थाने बहुरुड करण्याचे महान कार्य संत एकनाथांनी केले. भारूड म्हणले की , संत एकनाथांचेच नाव पुढे येते. एकनाथी भारुडांची संख्या,एकनाथांनी वैचित्र्य, व्यापकत्व , ठसठशीतपणा, त्यातील रुपकांची,विनोदांची आणि आत्मबोधाची बहार समाजातील सर्व स्तरातील  लोकप्रियता या सर्वच गोष्टी वैशिष्टपूर्ण आहेत. नाथांचे लोकजीवनाचे निरीक्षण थक्क करणारे आहे.विविध अशा  130 विषयावर त्यांनी सुमारे 400 भारुडे केलेली आहेत त्यामध्ये देवदेवता ,देवतांचे उपासक ,स्त्रीवर्ग ,समाजातील सेवकवर्ग ,कष्टकरी वर्ग,दलित वर्ग आणि अन्य विषयावर  (प्राणी,पक्षी,वाघ ,खेळ .)भारुडे रचली.

          नाथांच्या भारुडात तत्कालीन समाजातील सर्व विषय समाविष्ट झालेले आहेत .एकनाथांच्या भारुडाना सामाजिक दृष्ट्या महत्त्व आहे. भारुडातील आध्यात्मिक रूपक योजनेसाठी लौकिक व्यवहारातील तपशील उपमान म्हणून योजल्यामुळे नाथकाळातील समाजाचे चित्र साकार झालेले आहे .सोळाव्या शतकातील राजकीय आणि धार्मिक परिस्थिती ,समाजातील लोक त्याचे जीवन ,समाजात रूढ असलेल्या प्रथा साजरे केले जाणारे सण ,उत्सव ,प्रचलित खेळ यांचे दर्शन भारुडातून घडते .नाथांच्या भरुडातील आध्यात्मिक तत्वज्ञानासबंधी विचार केला असता असे दिसून येते की, तत्वज्ञानात वेदातील कर्म ज्ञान, भक्ती ही तत्वे घेऊन वेदांत शास्त्रातील अद्वैत भक्तीची त्यास जोड देऊन अध्यात्म सुत्राभोवती भारुडाची गुंफण केली आहे. परमार्थाचा बोध करून देणे हे नाथांच्या काव्याचे प्रयोजन आहे.

             संत एकनाथ हे थोर लोकशिक्षक आणी समाजशिक्षक हि होते. त्यांचा द्रष्टेपणाची झळाळी त्यांच्या वाङ्मयातून प्रकटते. नाथांच्या भारुडात अध्यात्म आणि साहित्य, काव्य आणि नाट्य ,लोककला आणि लोकवाङ्मय , लोकभाषा आणि लोकपरंपरा,उदभोग आणि रंजन, प्रपंच आणि परमार्थ, लौकिक आणि पारलौकिक अशा अनेक गोष्टींचा समन्वय साधला आहे. नाथांचा भारूडमधून समाजदर्शन आणि समाजप्रबोधन महत्वाचे आहे. त्यात सदाचार आणि नीती यावर फार मोठा भर आहे. समाजाला पेलणारी भाषा आणि पेलणारे तत्वज्ञान त्यात आढळते. संपूर्ण मानवी जीवनाचे चिंतन त्यातून व्यक्त होते.

 

                                                                                                                      -श्रीम .संपदा पोवार

                                                                                                                sampadapowar4@gmail.com

Comments